अदानी (ADANI) समुह आणि हिंडेनबर्ग (HINDENBURG) प्रकरणी सुनावणी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने १७ मे रोजी निकाल देताना सेबीला या प्रकरणाचा तपास १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. सेबीने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे 6 महिन्यांचा वेळ मागितला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंतच मुदत दिली असून आता सेबीला १४ ऑगस्टपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण करायचा आहे.
काही महिन्यांपूर्वी अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्गने अदानी समुहावर शेअर्समध्ये हेराफेरी केल्याचा आरोप केला होता. तसेच अदानी समूहाने फेरफार करून परदेशात पैसे पाठवल्याचा आरोप केला होता, जो अदानी समूहाने फेटाळला होता.
११ जुलै रोजी पुढील सुनावणी
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाला १४ ऑगस्टपर्यंत तपास पूर्ण करण्यास सांगितले असून याशिवाय अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार असल्याचे सांगितले आहे. आज सरन्यायाधीश चंद्रचूड, न्यायमूर्ती नरसिंहा आणि न्यायमूर्ती पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. शेवटच्या सुनावणीपूर्वी सेबीने सर्वोच्च न्यायालयाकडे पुन्हा सह महिन्यांची मुदत मागितली होती.
सेबीचा य़ुक्तिवाद
आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सेबीने आपला युक्तिवाद मांडला. सेबीने सांगितले की, ज्या १२ सौद्यांची चौकशी केली जात आहे ते खूपच गुंतागुंतीचे आहेत, कारण अनेक सौद्यांमध्ये उप-व्यवहार आहेत. अनेक देशी विदेशी बँका आणि ऑन-शोअर आणि ऑफ-शोअर संस्थांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी लागेल. सेबीने पुढे सांगितले की, कोणत्याही निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक सौदे, करार आणि व्यवहारांची चौकशी करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदार आणि बाजाराच्या हिताला न्याय मिळावा, हा तपासाचा कालावधी वाढवण्याचा हेतू आहे आणि संपूर्ण तपासाशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचून न्याय मिळणार नाही, तर कायदेशीर बाजूही कमकुवत होईल.
सेबीचा सखोल तपास सुरू
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून सेबीने ‘अदानी-होल्सीम डील’मध्ये वापरल्या गेलेल्या एसपीव्हीचा तपशील मागवला होता आणि नियामकाने गेल्या एका वर्षात अदानी ग्रुपने केलेल्या सर्व डीलची छाननी सुरू केली असल्याची माहिती मिळत आहे. अदानी समूहाच्या वतीने जे सर्व व्यवहार झाले आहेत, त्या सर्व व्यवहारांची सेबी चौकशी करत आहे आणि तपासाला गती दिली आहे. साधारणपणे जे खुलासे मागवले जात नाहीत तेही मागवले गेले, अशी माहिती मिळत आहे.