लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
दोनअडीच वर्षांपूर्वी एका व्यवसायीकाचा कॉल आला होता. ग्रामीण भागातील होते. स्वतःच लहानसं किराणा दुकान होतं. व्यवसाय बऱ्यापैकी चालू होता, पण पैसा अपेक्षेप्रमाणे शिल्लक राहत नव्हता. ग्रामीण भागात खूप मोठा व्यवसाय शक्य नसतो, पण तरीही किराणा दुकान हा चांगला पैसा मिळवून देऊ शकतो.
त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी त्यांच्या व्यवसाय आणि घरासंबंधी आणखी एक समस्या सांगितली. त्यांचे कुटुंब मोठे आहे. घरात तीन चार लहान मुले आहेत. मुलं त्यांना वाट्टेल तेव्हा दुकानात येऊन त्यांना हवे असलेलं चॉकलेट, बिस्कीट, चिप्स आणि इतर खाद्यपदार्थ घेऊन जातात. लहान मुले असल्यामुळे याचा हिशोब ठेवलाच जात नव्हता. यासोबतच त्यांना घरासाठी जे जे काही सामान लागायचे ते वाट्टेल तेव्हा ते दुकानातून घेऊन जायचे, याचाही कोणता हिशोब ठेवला जात नव्हता. थोडी सविस्तर चर्चा करताना लक्षात आलं कि या दोन गोष्टींवर नियंत्रण नसल्यामुळे कित्येकवेळा गरजेपेक्षा जास्त सामान घरातच जात आहे. मुलांना चॉकलेट विकत घ्यायला गेलो तर तर आपण दररोज १०-२०-५० रुपये खर्च करणार नाही, पण इथे दररोज मुलांसाठी ५०-१०० रुपयांचे काही ना काही पदार्थ घेतले जात असत.
घरासाठी जे जे सामान नेले जायचे त्याचाही घोळ असाच होता. सामान्यपणे आपण महिनाभराचा किराणा घेऊन येतो आणि त्यात महिन्याचं बजेट भागवतो. यात महिन्याच्या शेवटपर्यंत सगळा किराणा पुरालाच पाहिजे अशाच प्रकारे नियोजन केलं जात. पण इथे कधीही किराणा माल फुकटात (म्हणजे त्या वेळेला पैसा द्यावा लागत नसल्यामुळे) उपलब्ध असल्यामुळे त्याच्या वापरावर निर्बंधच नव्हते. यामुळे कित्येकवेळा गरजेपेक्षा जास्त किराणा वापरला जायचा. यामुळे महिन्याकाठी ५-६ हजार रुपये जास्तीचे खर्च होत होते. पण खिशातून रोखीच्या स्वरूपात न जाता किराणा मालाच्या निमित्ताने अप्रत्यक्षपणे जात असल्यामुळे लक्षातच येत नव्हते. घरच्यांच्या हे लक्षात येत नव्हतं, आणि यांना त्यावर नियंत्रण ठेवता येत नव्हतं… ते आपल्याच दुकानाचे फुकटे ग्राहक बनले होते. आणि यामुळे महिन्याकाठी अनावश्यक पैसे खर्च होत होते.
पैसा शिल्लक न राहण्याचा नेहमीप्रमाणे एक महत्वाचा मुद्दा होताच, तो म्हणजे दररोजचे हिशोब न ठेवणे. यामुळे कुणी, कधी, किती पैसे घेतलेच याचा हिशोब राहत नव्हता. याचा परिणाम गल्ल्यात कधी पैसेच शिल्लक राहत नव्हते. त्यासंबंधीचीही त्यांना सविस्तर माहिती दिली.
सध्याचा मुद्दा आहे आपल्याच व्यवसायाचे फुकटे ग्राहक होण्याचा. त्यांना उपाय सांगितला कि दुकानातून कुटुंबाला लागेल ते द्या, पण पण प्रत्येकाचा हिशोब ठेवा… दुकानाच्या गल्ल्यातून हवे तेव्हा पैसे काढत असाल तरी हरकत नाही, पण ते प्रत्येक डेबिट लिहून ठेवा. आपल्या दुकानातून काही माल घेताय म्हणजे ते फुकट नाहीये, ते फक्त आपल्याला सामान्य ग्राहकांपेक्षा थोडे स्वस्त मिळालेले आहे इतकेच. त्यामुळे जेव्हा कधी दुकानातून काही माल बाहेर काढाल तेव्हा त्याचा हिशोब लिहून ठेवा आणि महीन्याकाठी आपण किती अतिरीक्त खर्च केलाय याचा अंदाज घ्या, किंवा जेव्हा कधी काही माल आपल्यासाठी घ्याल तेव्हा त्याचे पैसे गल्ल्यात टाका. म्हणजे ते खरेदी केल्यासारखा व्यवहार करा. यामुळे आपण करत असलेला खर्च आवश्यक आहे कि, माल दुकानात आहे, लगेच पैसा कुणाला द्यायचा नाहीये म्हणून आपण अनावश्यक खर्च करतोय याचा अंदाज येईल.
दोन तीन महिन्यांनी त्याचा पुन्हा कॅल आला… समस्या पूर्णपणे सुटल्याचे त्यांनी सांगितले. एक तर हिशोब ठेवण्याची सवय लागली. पैशाचा येण्या जाण्याचा अंदाज यायला लागला. यामुळे जाणाऱ्या पैशावर नियंत्रण ठेवता आलं. कुणी, कधी, किती पैसे घ्यायचे याचे नियमन केले. यामुळे थोडे थोडे करून पैसे घेण्यावर बंधन आले. थोडे थोडे करून एकत्रितरित्या खूप मोठी रक्कम होते हे लक्षात आले. स्वतःच्या दुकानातला माल स्वतःसाठी घेतानाही त्याचा हिशोब लिहून ठेवण्याच्या सवयीमुळे आपण स्वतःसाठी काही अनावश्यक खर्च करतोय का याचाही अंदाज यायला लागला. यातून अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळवत गेले. आणि पैसा शिल्लक न राहण्याची मुख्य समस्या आपोआपच सुटली…
फुकटे ग्राहक हे नेहमीच आपल्या व्यवसायाला मारक असतात. त्यामुळे आपण स्वतः सुद्धा आपल्या व्यवसायाचे फुकटे ग्राहक कधीच होऊ नये…
व्यवसाय साक्षर व्हा…
_______________________
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.