शेअरबाजारात विविध प्रकारचे व्यवहार केले जातात या सर्वच व्यवहारांना ट्रेडिंग म्हटले जाते. ट्रेडिंग कालावधीनुसार त्यास वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. हा कालावधी अल्प मध्यम आणि दीर्घ मुदतीत विभागला असला तरी त्यास निश्चित सीमारेषा नाही. सदर कालावधी सेकंदाच्या काही भागापासून कित्येक वर्षांचा असू शकतो. दीर्घकालीन गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळत असला तरी अल्पकालीन गुंतवणुकीतूनही लाभ होत असल्याने बाजारात सर्वाधिक व्यवहार हे डे ट्रेडिंग आणि त्याखालोखाल पोझिशनल ट्रेडिंग या प्रकारात होत असतात.
डे ट्रेडिंगमध्ये सर्व व्यवहार त्याच दिवशी पूर्ण केले जातात तर पोझिशनल ट्रेडिंगमध्ये हा काळ काही दिवस ते वर्ष एवढा असू शकतो. डे ड्रेडिंग मधील अत्यल्प कालातील वारंवार केल्या जाणाऱ्या व्यवहारांना स्कॅल्पिंग म्हटले जाते त्याचप्रमाणे पोझिशनल ट्रेडिंगमध्ये कमी कालावधीत बाजारातील किंमत लाटेप्रमाणे वरखाली होण्याच्या कालावधीचा अंदाज बांधून जे व्यवहार पूर्ण केले जातात त्यास स्विंग ट्रेडिंग असे म्हणतात. ते बाजारात नोंदलेल्या कोणत्याही मालमत्ता प्रकारात म्हणजेच शेअर्स, रोखे, इंडेक्स, कमोडिटी, करन्सी या सर्वच प्रकारात करता येणे शक्य आहे. मध्यम कालावधीत किंमतीत पडणाऱ्या फरकातून लाभ मिळवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. यामधून आपल्याला पोझिशनल ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग यातील सूक्ष्म फरक लक्षात आला असेल प्रत्येक स्विंग ट्रेडिंग हे पोझिशनल ट्रेडिंग असले तरी त्याचा कालावधी हा पोझिशनल ट्रेडिंगच्या कालावधीहून निश्चितच कमी असतो. यातील सर्व कालावधी हे व्यक्तीसापेक्ष आहेत.
स्विंग ट्रेडिंगची वैशिष्ट्ये
● कमी कालावधी –
स्विंग ट्रेडिंगमध्ये केल्या जाणाऱ्या व्यवहारांचा कालावधी हा एक दिवस ते काही आठवडे असू शकतो. बदलणारे भाव सातत्याने पडद्यावर न पहाता भाव हालचाल (प्राईज एक्शन) याचा अंदाज घेऊन ट्रेडर्स खरेदी विक्रीचा निर्णय घेतात यातील रोखीच्या व्यवहाराव्यतिरिक्त अन्य सर्व मालमत्ता प्रकारातील व्यवहारात खरेदी अथवा विक्री व्यवहार (शॉर्ट सेलिंग) आधी करता येऊ शकतात.
● निश्चित उद्दिष्ट –
स्विंग ट्रेडिंग करण्यामागे विशिष्ठ कालावधीत भावातील फरकाचा लाभ घेणे अथवा आपली जोखीम मर्यादा (स्टॉप लॉस) संपल्यास त्यातून बाहेर पडणे अपेक्षित आहे. त्यानुसार कोणत्या भावात खरेदी किंवा विक्री करायची, कधी हा व्यवहार सोडून द्यायचा ते आधीच ठरवलेले असते त्यानुसारच व्यवहार केले जातात.
● तांत्रिक विश्लेषणाचा आधार –
स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी योग्य कंपनी निवडणे अपेक्षित असून त्यासाठी काही लोक मूलभूत विश्लेषणाचा वापर करीत असले तरी भाव हालचाली ओळखण्यासाठी तांत्रिक विश्लेषण म्हणजेच विविध आलेख, त्याच्या रचना आणि त्यातून समजणारा अर्थ याचाच प्रामुख्याने वापर केला जातो.
● बाजाराचा कल –
बाजार हा अष्टपैलू कलाकार असून तो आपले रंग सातत्याने बदलत असतो स्विंग ट्रेडिंगसाठी बाजाराचा कल ओळखता येणे हे गरजेचे आहे तुम्ही त्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहता ते यात महत्वाचे ठरते. यात प्रामुख्याने दोन दृष्टीकोन सांगता येतील
◆ सर्प दृष्टी – साप जमिनीवर सरपटत असल्याने त्याला खूप छोटी गोष्ट कितीतरी मोठी दिसते.
◆ गरुड दृष्टी – गरुड उंच आकाशात विहार करीत असल्याने त्यास कितीही मोठी गोष्ट छोटी वाटू शकते.
या दोन्ही संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी ज्या व्यक्तींना चार्टबद्धल प्राथमिक माहिती आहे त्यांनी मनीकंट्रोल किंवा कोणत्याही संकेतस्थळावरील 1दिवस, 5 दिवस, 1महिना, 6 महिने, 1 वर्ष, 5 वर्ष त्यापुढे जाऊन 10 वर्ष, 15 वर्ष 25 वर्ष असे निफ्टी आलेख पाहावेत. जसजसे हे आलेख आपण एकाच फ्रेमवर पहाल तसतसा आपला त्याकडे पाहायचा दृष्टिकोन अधिकाधिक विशाल होत जाऊन गेले काही दिवसात बाजारात झालेली पडझड किरकोळ वाटू लागेल. सोबत नमुन्यादाखल 1 दिवस ते 5 वर्षाचे 6 आलेख जोडले आहेत ते जरूर पाहावे. अनेक ट्रेडर त्यांच्या व्यवहाराकडे आपापल्या नजरेतून पाहत असल्याने त्याबद्दल त्यांनी बाजाराच्या दिशेबद्धल बांधलेल्या अंदाजात फरक पडतो.
● जोखीम व्यवस्थापन –
बहुतेक स्विंग ट्रेडर्सना आपल्या जोखीम स्विकारण्याच्या मर्यादा माहिती असल्याने फारसे नुकसान न होऊ देता आपले भांडवल सुरक्षित राहावे असे वाटत असते. त्याप्रमाणे आपण किती नुकसान सहन करू शकू याच्या कुवतीनुसार ते त्यांच्या स्टॉप लॉस ऑर्डर्स आधीच टाकून ठेवतात. ही सुविधा ब्रोकरेज फर्म ने आपल्या ग्राहकांना दिली असून त्यामध्ये विशिष्ट भाव आला की अपेक्षित खरेदी अथवा विक्रीची ऑर्डर सिस्टीममधून आपोआप टाकली जाते.
सर्वसाधारणपणे कमी कालावधीत कमी जोखीम प्रत्करून आपले भांडवल सुरक्षित रहावे आणि फायदा मिळत राहावा असे वाटणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांची इच्छापूर्ती होऊ शकेल असा मार्ग आहे. अशा संधी प्रत्येक चढत्या अथवा उतरत्या दिशेने जाणाऱ्या बाजारात असल्या तरी त्या एका पातळीत राहणाऱ्या बाजारात अधिक असतात. अनेक सर्वसामान्य गुंतवणूकदार, मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार, देशी विदेशी वित्तसंस्था ही पद्धत वापरत असून त्यातून आकर्षक अधिक्य मिळवत आहेत.
फायदे-
●अधिक लवचिक व्यवहार –
डे ट्रेडर्सच्या तुलनेत स्विंग ट्रेडर काही दिवस काही आठवड्याने व्यवहार पूर्ण करीत असल्याने त्यात अधिक लवचिकता असते.
●कमी ताण देणारे –
हे व्यवहार लगेच पूर्ण करायचे नसल्याने मागे पुढे केले तरी चालते त्यामुळे असे व्यवहार पूर्ण करताना येणारा मानसिक ताण कमी असतो.
●अधिक लाभदायक –
हे व्यवहार मध्यम कालावधीसाठी करण्यात येत असल्याने योग्यवेळी प्रवेश करून त्यांची पूर्तता केल्यास अधिक लाभ मिळू शकतो.
●तंत्र आणि तंत्रज्ञानस्नेही –
स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी वेगवेगळी तंत्र आणि तंत्रज्ञान वापरले जात असल्याने त्यातील ज्ञान आणि त्याचा योग्य वापर करण्याचे कौशल्य असलेल्या व्यक्ती अनुभवातून त्यात यशस्वी होऊ शकतात.
तोटे
●बाजार प्रदर्शन –
आपले व्यवहार जेवढे दिवस होल्ड करून ठेवणार तेव्हा विविध बातम्या, अफवा किंवा अन्य शेकडो कारणांनी भाव वरखाली होऊ शकतात. त्यातून अंदाज चुकूही शकतात.
●अधिक ब्रोकरेज-
या व्यवहारांवर अधिक दलाली आणि इतर आकार द्यावे लागतात त्यामुळे अधिकाधिक व्यवहार झाले तर झालेल्या प्रत्येक खरेदी विक्री व्यवहारावर अधिक ब्रोकरेज द्यावे लागते. यामुळे खर्चात वाढ होते. अनेक दलाली पेढ्यानी गुंतवणूकदारांना यासाठी सुलभ ब्रोकरेज पर्याय दिले आहेत त्याचा अवश्य विचार करावा.
●ताणतणाव –
व्यक्तीसोबत भाव भावना आल्या त्यामुळे बाजारातील तीव्र हालचालींचा ताणतणाव स्विंग ट्रेडिंग करणाऱ्यांवर येऊ शकतो.
●निर्णय घेण्यावर मर्यादा –
हे व्यवहार अधिक कालावधीसाठी होत असल्याने बदललेल्या परिस्थितीनुरूप तात्काळ निर्णय घेण्यावर मर्यादा येतात.
●सर्व गुंतवणूकदारांसाठी अयोग्य –
स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी खास कौशल्य लागत असल्याने ते सर्वाना योग्य होईल असे नाही. नवीनच व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ते आव्हानात्मक ठरू शकतं.
स्विंग ट्रेडिंगच्या लोकप्रिय पद्धती
● ट्रेंड फॉलोईंग – बाजार कल ओळखून त्या दिशेने केले जाणारे व्यवहार
● रिव्हर्सल ट्रेडिंग – किंमत बदलावर बाजारातील कलबदल आधीच ओळखून केलेले व्यवहार
● ब्रेकआऊट ट्रेडिंग – सपोर्ट रेझिस्टन्स मधील बदल त्वरित ओळखून केलेले व्यवहार
● मोमेंटम ट्रेडिंग – बाजार कल बदल किती काळ राहील याचा अंदाज बांधून केलेले व्यवहार
● स्विंग हाय स्विंग लो – वाढत जाणारे भाव काही काळाने स्थिर होऊन खाली येणार किंवा कमी कमी होत असलेला भाव कुठेतरी स्थिर होऊन वाढणार ते बिंदू निश्चित करून केलेले व्यवहार
डे ट्रेडिंग आणि लॉंगटर्म ट्रेडिंग यामधील समतोल साधणारा मध्यममार्ग म्हणून पोसिशनल ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग याकडे पाहता येईल. यशस्वी स्विंग ट्रेडर्स होण्यासाठी – तांत्रिक विश्लेषणाचे सखोल ज्ञान, जोखीम व्यवस्थापनाचे ज्ञान, स्वयंशिस्त, बाजारज्ञान आणि स्थितप्रज्ञ वृत्ती असणे गरजेचे आहे.
©उदय पिंगळे
_
© उदय पिंगळे
8390944222
लेखक गुंतवणूक अभ्यासक, मार्गदर्शक व सल्लागार आहेत.
====================
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखातील मते पूर्णपणे वैयक्तिक असून ती कोणतीही शिफारस करीत नाहीत.)
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील