आर्थिक नियोजनासंबंधी काही उपयुक्त टिप्स


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

आर्थिक नियोजन हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. परंतु बहुतेकांचा या नियोजनाशी संबंध वयाच्या तिशीपर्यंत येतंच नाही. वयाची तिशी पार करत असताना मागच्या चुका समोर येतात आणि मग पुढे काय करायला हवं याचा विचार सुरु होतो. २२-२५ वयात व्यवसाय सुरु केला असेल आणि आर्थिक नियोजनासंबंधी मार्गदर्शन करायला कुणी नसेल तर पुढची चार पाच वर्षे कितीही काम केलं तरी शिलकीत पैसा दिसतंच नाही. म्हणून आर्थिक नियोजनासंबंधी आपण जास्तीस्त जास्त चौकस असायला हवे. यासंबंधी मिळेल तेवढे मार्गदर्शन घ्यायला हवे. माझ्या स्टार्टअप आणि बिजनेस मॅनेजमेंट कन्स्लटिंगमधे सुद्धा मी या विषयावर भर देत असतो. कारण व्यवसायाच्या सुरुवातीच्या १० वर्षात आपण काय करतो यावर व्यवसायाचे भवितव्य ठरत असते…

आर्थिक नियोजनासंबंधी काही उपयुक्त टिप्स पाहुयात

१. उत्पन्नाची विभागणी
हे उत्पन्न आपल्या व्यवसायाचे नसून आपले वैयक्तिक आहे हे लक्षात घ्या. आपल्या व्यवसायातून आपण आपल्यासाठी जी रक्कम काढतो ते आपले वैयक्तिक उत्पन्न झाले.
आपल्या एकूण निव्वळ उत्पन्नापैकी जास्तीत जास्त २५% रक्कम हि घर खर्चासाठी वापरली पाहिजे.
२५% रक्कम हि कर्ज, देणी इत्यादींसाठी खर्च केली पाहिजेत.
३०% रक्कम हि गुंतवणुकीसाठी वापरली पाहिजे.
आणि उरलेली २०% रक्कम आपल्या मनोरंजनासाठी व इतर खर्चासाठी राखीव असली पाहिजे.
उत्पन्न जसजसं वाढत जाईल तसतशी घरखर्चाची रक्कम टक्केवारीमधे काही होऊन गुंतवणुकीची रक्कम वाढत गेली पाहिजे.
या गुंतवणुकीतून येणाऱ्या उत्पन्नातील हिस्सा आपण मनोरंजनासाठी वापरू शकतो.
आपला मुख्य उत्पन्नाचा स्रोत हा जास्तीत जास्त बचतीकडेच वळवला पाहिजे.

हि टक्केवारी मध्यम स्वरूपाच्या उत्पन्नासाठी आहे. यापुढे घरखर्च कमी होत जातो आणि शिलकीचे प्रमाण वाढत जाते. याच शिलकीतून गुंतवणुकीचे प्रमाण वाढत जाते.

२. आर्थिक तरतूद
किमान ६ महिन्यांचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे नेहमी राखीव असला पाहिजे. अचानक काही परिस्थिती उद्भवली, उत्पन्न बंद झाले तर घरखर्च, कर्ज हफ्ते सुरळीत फेडता येतील याची तजवीज आधीच करून ठेवलेली असली पाहिजे. खर्च भागविण्यात काही अडचण येणार नाही याची तजवीज करून ठेवणे महत्वाचे.

३. मुलांच्या शिक्षणाचे व लग्नाचे प्लॅनिंग
मुलांच्या भविष्यातील शिक्षणासाठी व लग्नासाठी सुरुवातीपासूनच थोडी थोडी रक्कम जमा करत जावी. अजून लग्न झाले नसेल तर थोडा वेळ घेऊ शकता पण लग्न झालेले असेल, मग भलेही आत्ताच झाले असले, तर पुढच्या २० वर्षात मुलाबाळांसाठी लागणाऱ्या खर्चाच्या हिशोबाने आत्तापासूनच गुंतवणुकीचे नियोजन असायला हवे. भरपूर वेळ आहे, बघूनंतर अशा विचाराने वेळ संपत जातो आणि शेवटी एकदम आर्थिक दडपण येते.

४. प्रॉपर्टी मधे गुंतवणूक
प्रॉपर्टीमधे गुंतवणूक असावी. ती एक चांगली आणि खात्रीशीर गुंतवणूक आहे. पण गुंतवणुकीच्या नादात जर आपण बँकेचे हफ्ते, इतर देणी वाढवून ठेवलेले असेल तर त्याला गुंतवणूक म्हणता येणार नाही. उलट यामुळे आपल्यावरील आर्थिक दडपण वाढत जाते. जर एखादे शॉप किंवा घर घेतले असले तर ते भाड्याने देणे आवश्यक आहे. भाड्याच्या रकमेतून देणी क्लिअर झाली पाहिजेत.

५. इन्श्युरन्स
इन्श्युरन्स हि गुंतवणूक नाही. इन्श्युरन्स सुरक्षा असते. हेल्थ इन्श्युरन्स आपला औषधोपचारांवर होणार खर्च कमी करतो. इतर इन्श्युरन्स आपल्याला अडीअडचणीला कामी येतात. न होवो, पण आपल्याला काही झालं तर आपले कुटुंब आर्थिक अडचणीत येत नाही. तसेच इन्श्युरन्स वर आपल्याला अडचणीच्या काळात कर्जही उपलब्ध होऊ शकते. एकप्रकारे इन्श्युरन्स आर्थिक सुरक्षा आणि बचत या दोन्हींचा संगम असतो. हेल्थ इन्श्युरन्स तर संपूर्ण कुटुंबाचा असायलाच हवा. औषधोपचारांवरचा खर्च हे आपल्या आर्थिक अडचणींचे एक मोठे कारण आहे.

६. वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक.
गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग अवलंबवावेत. प्रॉपर्टी, शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने, चांदी अशा विविध क्षेत्रात गुंतवणूक असावी. शक्य झल्यास काही स्टार्टअप्स मध्ये गुंतवणूक करावी. भागीदारीमधे, आपण अडकून पडणार नाही अशा व्यवसायात, गुंतवणूक करावी. उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत निर्माण करावेत.

७. IT रिटर्न व आर्थिक सल्लागार
आपला IT रिटर्न वेळच्या वेळी फाईल करा. IT रिटर्न आपल्या व्यावसायिक आयुष्यात खूप महत्वाचा असतो. कर्ज मिळवण्यात IT रिटर्न महत्वाचा ठरतो.
एक चांगला आर्थिक सल्लागार सोबतीला असणे आवश्यक असते. आर्थिक सल्लागार आपला बराच अनावश्यक खर्च वाचवू शकतो आणि आपली गुंतवणूकाही अल्पावधित चांगल्या प्रकारे वाढवू शकतो.

८. प्रगतीपुस्तक
आपल्या उत्पन्नाचा आणि गुंतवणुकीचा आलेख दर सहा महिन्यांनी तपासावा. आपली प्रगती अपेक्षेनुसार आणि ठरवलेल्या प्लॅनिंगनुसार होत आहे कि नाही तपासावे. आपल्या नियोजनात आणखी काही सुधारणा आवश्यक असल्यात त्यादृष्टीने कार्यवाही करावी.

९. आर्थिक व गुंतवणुकीची माहिती
सर्व आर्थिक व्यवहारांची, गुंतवणुकीची, खरेदीविक्रीची कागदपत्रे सांभाळून ठेवावीत. याचे स्वतंत्र फाईल्स, कपाट किंवा लॉकर असावे. सर्व व्यवहार लिहून ठेवावेत. तोंडी आकडेवारी मांडू नका. आपल्या कुटुंबियांपासून आपले व्यवहार लपवू नका. प्रॉपर्टीची व आर्थिक व्यवहारांची माहिती तर बिलकुल लपवू नका.

१०. कर्जाची रिव्हीजन करत राहा
बऱ्याचदा जुन्या कर्जाचे व्याजदर जास्त असतात आणि नवीन व्याजदर कमी झालेले असतात. जुने कर्ज कमी करून त्याबदल्यात नवीन कर्ज घेऊन हा व्याजदर कमी करता येतो. आपण देत असलेले व्याज प्रमाणाबाहेर नाहीये याची वेळोवेळी खातरजमा करत चला. प्रमाणाबाहेर व्याज देऊ नका. सावकारी कर्जात अडकू नका. आयुष्यभर कर्जात राहू नका. चाळिशीनंतर कर्ज कमी करत चला. रिटायरमेंट चे जे काही वय तुम्ही ठरवले असेल त्या वयानंतर तुम्ही कर्जमुक्त असायला पाहिजे.

११. रिटायरमेंट
आपल्याला कधी रिटायर व्हायचे आहे हे निश्चित करून घ्या. त्यानुसार आपल्या पुढील आयुष्यासाठी उत्पन्नाचे नियोजन करा. आयुष्यभर काम करत राहावे लागेल अशा प्रकराची कोणतीही अर्थिक गडबड करू नका.

या काही आर्थिक नियोजनासंबंधी टिप्स आहेत. आपल्याकडे एखादा चांगला आर्थिक सल्लागार असायला हवा. CA जवळचा असेल तर उत्तम. ते तुम्हाला चांगले मार्गदर्शन करू शकतात. तसेच आर्थिक सल्लागार म्हणून स्वतंत्र प्रक्टिस करणारेही काही प्रोफेशनल्स असतात. त्यांचीही चांगली मदत होते. आपले आर्थिक ज्ञान वेळोवेळी वाढवत जाणे महत्वाचे असते. अशा विविध सल्लागारांकडून जेवढे ज्ञान मिळेल तेवढे घेत जावे व स्वतःला समृद्ध करत जावे… या मिळालेल्या ज्ञानाचा वापर आपल्या आयुष्याला आर्थिक स्थिरता आणण्यासाठी करावा…

पण, हे नियोजन करताना स्वतःवर दडपण येऊ देऊ नका. एखादे टास्क पूर्ण होतच नाहीये, किंवा पूर्ण करण्यात उशीर होतोय अशा गोष्टींचा आपल्या मनावर ताण पडू देऊ नका. आयुष्याचे मुख्य ध्येय्य हे तणावमुक्त राहण्याचे असावे. आर्थिक नियोजन हे आपल्याला तणावमुक्त ठेवण्यासाठी आहे आपला तणाव वाढवण्यासाठी नव्हे हे लक्षात असू द्यावे.

अर्थसाक्षर व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!