उलाढालीच्या प्रमाणात जाहिरातीच्या खर्चाचे प्रमाण कसे ठरवावे?


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

लघुद्योगांसाठी जाहिरातीचं बजेट आणि मिळणारा रेव्हिन्यू याचे प्रमाण सामान्यपणे कमाल १:१० व किमान १:१४ असतं. म्हणजे सामान्यपणे एकूण उत्पन्नाच्या ७-१०% खर्च आपण जाहिरातीवर करू शकतो. जर महिन्याला आपले उत्पन्न १ लाख असेल तर आपण ७-१० हजार रुपये जाहिरातीसाठी खर्च करू शकतो. याच्या उलट आपल्याला किती उलाढाल अपेक्षित आहे यानुसार जाहिरातीवर किती खर्च करावा हेही पण ठरवू शकतो. म्हणजे जर आपल्याला महिन्याला १ लाख रुपयांची उलाढाल अपेक्षित असेल तर आपण किमान १० हजार रुपयांचे जाहिराती बजेट बाजूला काढणे आवश्यक असते.

व्यवसाय नवीन असताना जाहिरातीचे बजेट थोडे जास्त असते. व्यवसाय नवीन असल्यामुळे आपला सुरुवातीचा वेळ लोकांपर्यंत पोहोचण्यातच जातो. काही महिने जाहिरात लोकांना आपला व्यवसाय दाखवण्यासाठीच केली जाते. हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढायला लागतो. सुरुवातीच्या काळात एकूण उलाढालीच्या (किंवा अपेक्षित उलाढालीच्या) १५% पर्यंत आपण जाहिरातीवर खर्च करू शकतो. जाहिरात सतत करत असताना काही महिन्यांनी हे बजेट ७-८% पर्यंत खाली आणता येऊ शकते. मोठ्या आणि जुन्या असलेल्या व्यवसायात हे प्रमाण ५% पर्यंत असले तरी चालते.

मी माझ्या क्लायंट साठी जेव्हा कोणतेही कॅम्पेन करतो तेव्हा याच प्रमाणात जाहिरातीचे बजेट आणि अपेक्षित उलाढाल ठरवत असतो. त्यांचा प्रोजेक्ट, एकूण अपेक्षित उलाढाल यांचा अंदाज घेऊन जाहिरातीचे बजेट ठरवले जाते. पण मी काहीही बजेट सांगितलं तरी, मोठे व्यावसायिक आणि पुण्या मुंबईतले प्रोफेशनल क्लायंट सोडले तर इतर भागातील क्लायंट कमीत कमी बजेटची जाहिरात करा एवढंच म्हणतात. यातून पुढे मग अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. त्यांना हजार रुपयाच्या बजेटवर लाखाची उलाढाल अपेक्षित असते जे कधीही शक्य होणार नसते. पण या बचतीच्या नादात व्यवसाय एक दोन महिने मागे जातो हे त्यांच्या लक्षात येत नाही.

मागच्या दोन महिन्यापासून मी एका फूड सेक्टरमधील ब्रँड साठी प्रमोशन करतोय. या दोन महिन्यात आमच्या जाहिरातीचा खर्च हा उलाढालीच्या ८-१०% होत आहे. व्यवसाय नवीन असल्यामुळे आम्ही आधी बजेट ठरवतोय आणि त्यानुसार कॅम्पेन आखून अपेक्षित रिझल्ट घेत आहोत. माझ्या एका जवळच्या व्यक्तीसाठी केलेल्या कॅम्पेनमधे मागच्या महिनाभरात ५ हजाराच्या कॅम्पेन वर ४० हजार उलाढाल झालेली आहे. हा उलाढाल आणि जाहिरात खर्चाचा रेशो सामान्यपणे नव्या व्यवसायासाठी १०-१५% असू शकतो, आणि सुरळीत चालू असलेल्या व्यवसायासाठी ७-१०% असू शकतो. हि नियमावली नसून सामान्यपणे केली जाणारी प्रॅक्टिस आहे. प्रोडक्ट कोणतेही असो सरासरी आकडेवारी काढल्यास हेच प्रमाण दिसून येते.

यातही प्रोडक्ट काय आहे यावरही जाहिरातीला मिळणारा प्रतिसाद अवलंबून असतो. खाद्यपदार्थांच्या जाहितींना जास्त प्रतिसाद मिळतो, इंडस्ट्रिअल जाहिरातींना प्रतिसाद मर्यादित असतो. अशाच प्रकारे कोणत्या भागातील व्यवसाय आहे, प्रेझेंटेशन स्ट्रॅटेजी कशी आहे, इमेजस कशा आहेत, कन्टेन्ट कसे आहेत यावरही प्रतिसाद अवलंबून आहे. पण कोणत्याही परिस्थितीमधे ७-१०% हे प्रमाण कायम असल्याचे दिसून येते.

जर तुम्ही जाहिरातीसाठी १५ हजार बजेट ठरवले असेल तर त्या प्रमाणात महिन्याला एक ते दीड लाखाच्या उलाढालीचे लक्ष्य ठेऊ शकता. व्यवसाय जुना असेल तर दीड ते दोन लाख उलाढालीचे उद्दिष्ट ठेऊ शकता. माझ्याकडे कॅम्पेनिंग साठी येणाऱ्या काही जणांच्या अपेक्षा खूपच जास्त असतात. ७-८ हजाराच्या कॅम्पेनमधे त्यांना चार पाच लाखाची उलाढाल अपेक्षित असते. सरासरी आकडेवारी पाहता ते शक्यच नसतं. कदाचित एखाद्या व्यवसायाला प्रमाणाबाहेर रिझल्ट येईल, पण तो नियम नाही, त्यामुळे त्याला बोनसच समजावा लागतो.

आपण जाहिरातीकडे फक्त व्यवसायातली एक प्रोसेस म्हणून पाहतो. त्याचा व्यवसायावर होणाऱ्या परिणामाची आपण दखल घेत नाही. म्हणून मग फक्त फॉर्मॅलिटी म्हणून कुठेतरी एखादी जाहिरात पब्लिश करण्याकडे कल असतो, एखादी सरकारी प्रक्रिया पूर्ण केल्यासारखं. जाहिरात हा व्यवसायातील महत्वाचा भाग आहे. जाहिरातीच्या बळावरच व्यवसाय मोठा केला जातो. मार्केटमधल्या ९०% व्यवसायांना जाहिरातीची गरज असतेच. पण जाहिरातीकडे पुरेसे लक्ष न दिल्याने त्यातून मिळणाऱ्या परताव्याचा सुद्धा लाभ घेता येत नाही.

प्रत्येक व्यवसायाला जाहीर लागतेच. मग ती प्रत्यक्ष जाहिरात असो किंवा अप्रत्यक्ष… ग्राहकांपर्यंत वेगवेगळ्या मार्गानी पोहोचणे आपल्याला आवश्यक असतेच. जाहिरातीचे बजेट कसे ठरवावे आणि त्यातून कशा प्रकारच्या रिझल्ट ची अपेक्षा करावी हा प्रश्न अनेकांना पडतो. याच अनुषंगाने हा लेखनप्रपंच…

[टीप – जाहिरातीचा खर्च हा प्रोडक्शन कॉस्ट मधे पकडायचा असतो, त्यामुळे एवढा खर्च जाहिरातीवर केल्यावर नफा कसा शिल्लक राहील असा प्रश्न विचारू नये… (मागील अनुभवावरून)]

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!